समाजात काम करताना…

गेले दिड वर्ष मी JSW फाउंडेशन फेलो म्हणून ग्रामीण भागात काम करत आहे. माझा विषय ग्राम पंचायत सबलीकरण आणि महिला सशक्तीकरण आहे. मी नागपूर जिल्ह्यात, कळमेश्वर तालुक्यात लिंगा (ला.) गट ग्राम पंचायत सोबत काम करत आहे. आमच्या ग्राम पंचायत मध्ये नऊ सदस्य आणि एक सरपंच असे मिळून एकूण दहा जणांची बॉडी आहे.

गेल्या चार महिन्यांपूर्वीच निवडणुका झाल्या आणि नवीन बॉडी निवडून आली. डिसेंबर महिन्यात उपसरपंच ही निवडले गेले आणि बॉडी ने आपला कारभार हाती घेऊन काम चालू केले. एक वर्ष मला आधीच्या ग्राम पंचायत बॉडी सोबत काम करण्याची संधी मिळाली. त्यांची काम करण्याची पद्धत, त्यांचे गाव विकासासाठी चे उपक्रम आणि योजनांची अंमलबजावणी हे जवळून बघता आले. आता नवीन ग्राम पंचायत बॉडी कशी काम करेल ह्याची उत्सुकता आहे.

गाव जणू काही एक परिवार असल्या सारखं आहे. सगळे एकमेकांचे नातलग असल्यासारखे राहतात. प्रेम ही तितकच आहे आणि गावातले अनेक प्रश्न ही. वेगवेगळ्या जातींचे, धर्माचे, कोणी गरीब तर कोणी मध्यम वर्गीय हे आपल्याला पाहायला मिळतं.

ग्राम पंचायत म्हटलं तर बहुदा डोक्यात एक विचार येतो तो म्हणजे राजकारण. आणि ते अगदी बरोबर आहे कारण राजकारण समाज कार्य करण्यासाठी एक माध्यम आहे आणि नाण्यासारखी त्याची दोन बाजू आहे चांगली आणि वाईट.

चला मग मी तुम्हाला आता माझ्या या प्रवासातले काही किस्से सांगतो.

मी जेव्हा सुर्वातिला गावात आलो तेव्हा मी सर्व्हे केला की गावात कोणत्या समस्या आहेत. सर्व्हे करताना गावातील सर्व घटकांशी संपर्क साधला आणि त्यांचे विचार जाणून घेतले. त्यात प्रामुख्याने ग्राम पंचायत, जिल्ला परिषद शाळा, अंगणवाडी, गावातील महिला आणि खास करून सर्व बचत गट, पुरुष मंडळी आणि प्रौढ वर्ग. त्या सर्व्हे मध्ये दोन समस्या पुढे आल्या त्या म्हणजे गावात स्वच्छता नाहीय आणि त्या मुळे लोकांना होणारा त्रास आणि दुसरा प्रश्न होता दारू बंदी.

मी पाहिला निवडला आणि स्वच्छतेवर काम करायचं ठरवलं. सुर्वातिला माहित नव्हतं की काय करायचं पण हळू हळू एक एक पान उलघडत गेलं. मी स्वच्छते संबंधी एक प्रश्नावली तयार केली. गावात स्वच्छतेसाठी राबवल्या जाणाऱ्या योजना, ग्राम पंचायत चा त्यात सहभाग आणि लोक स्वच्छतेसाठी काय करतात आणि कचऱ्याचे नियोजन असे प्रश्न त्यात होते.

मी पुन्हा एकदा सर्व घटकांशी चर्चा केली आणि ह्या प्रश्नाची उत्तरं जाणून घेतली. गावातील महिलांनी ह्याला चांगला प्रतिसाद दिला आणि स्वच्छतेचं चित्र माझ्या डोळ्या समोर उभ करून दिलं. नंतर होती शाळेतली मुलं ज्यांना स्वच्छते विषयी जाणीव होती पण स्वच्छता किती महत्त्वाची आहे ह्याच गांभीर्य नव्हतं. पुरुष मंडळींनी पण उत्तर दिली पण त्यांचा सहभाग इतका नव्हता.

हा टप्पा ही मी गाठला. आता प्रश्न होता की आपण स्वच्छता या विषयावर पूर्ण गावात काम करताना कोणा सोबत काम चालू केले पाहिजे आणि तेव्हा माझ्या डोक्यात आमच्या बचत गटाच्या महिला आल्या. हळू हळू त्यांच्याशी संपर्क वाढवून त्यांचे इतर प्रश्न जाणून घेतले आणि त्यांच्या सोबत गावात उपक्रम राबवत गेलो. सुर्वातिला फरश्या महिला काही येत नव्हत्या. आम्ही आठ ते दहा महिलांसोबत ग्राम स्वच्छता अभियानाची सुरावात केली. ह्या उपक्रमात गावकऱ्यांनी महिन्यातला एक तास गाव स्वच्छतेसाठी द्यावा आणि लोकांना एकत्र आणून त्यांचं संगठन करावं हा उद्देश होता. त्या नंतर संत गाडगे बाबा जयंती साजरी केली. हा पहिला उपक्रम होता जिथे आम्ही महिलांना ग्राम पंचायत मध्ये आणलं आणि ग्राम पंचायत चे सर्व सदस्यांना स्वच्छतेचं महत्त्व पटवून दिलं. इथे संगम झाला ग्राम पंचायत आणि बचत गटातील महिलांचा. या पुढे आम्ही सगळे उपक्रम ग्राम पंचायत सोबत राबवायला लागलो.

आज त्या उपक्रमाला एक वर्ष झालं. या वर्षभरात बरेच अनुभव आले आणि त्यातून बरच काही शिकायला मिळालं. पण एक महत्त्वाची गोष्ट जी मला सांगावीशी वाटते की समाजात काम करताना तुम्ही ज्या विषयावर काम करत आहात त्या विषयाचा सखोल अभ्यास असणं गरजेचं आहे तसच त्या विषयाचा इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र या सगळ्या बाजूने त्या प्रश्र्नाला बघण्याची गरज आहे.

हे बघितल्या नंतर त्या प्रश्नांवर काम करताना नेहमी नागरिकांचा यात सहभाग कसं करू शकतो आणि लोकसहभागातून हा प्रश्न कसा सुटेल हे बघणं महत्त्वाच ठरतं कारण प्रश्न त्यांचा आहे आणि जर लोकांनी एकत्र येऊन तो सोडवला तर त्याला शाश्वत राहील याची खात्री असते. हे करत असताना सगळ्या घटकांना एकत्र एका व्यासपीठावर घेऊन येण गरजेचं आहे कारण या घटकांचा त्या समस्ये कडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असेल आणि तो प्रश्न सोडवताना कदाचित सगळ्यांकडे वेगवेगळे उपाय ही असतील इतकचं नव्हे तर तुम्ही करत असलेल्या कामावर त्यांचा विश्वास कसा बसेल हे ही तितकंच महत्त्वाचं आहे कारण जर लोकांचा विश्वास तुमच्यावर बसला तर लोक तुम्हाला साथ देतील आणि सगळी घटक एकत्र आली तर सर्वांगीण विकास होईल ज्याला आपण म्हणून शकतो “पहले चाहिए सबका साथ, फिर झितना है सबका विश्वास और फिर मिलकर करेंगे गांव का विकास”. 

असं आहे हे गणित जे तुम्हाला समाजात काम करताना, वावरताना, कोणतंही सामाजिक पाऊल उचलताना कायम तुम्हाला डोळ्या समोर ठेवावं लागेल.

घरात आपण काहीही नवीन करताना मग घराला नवीन रंग काढायचा आहे किंवा कुठे फिरायला जायचा आहे, तेव्हा घरातील सर्व मंडळी बसून चर्चा करतात आणि निर्णय घेतात आणि मिळून त्यांची अंमलबजावणी करतात. गाव देखील एका परीवारासारख आहे जिथे लोक मिळून मिसळून प्रेमाने राहतात, अश्या वेळी गावाच्या समस्या सोडवताना सगळे घटक एकत्र आले तर सगळे प्रश्न ही लवकर सुटतील आणि गावचा विकास ही गतीने होईल.

-Blog By Pravin Patil

Leave a Reply